पुढील महिन्यापासून दिल्ली गोवा एक्स्प्रेस जेजुरीत थांबणार

0
24

माणदेश एक्स्प्रेस/जेजुरी : पुणे ते कोल्हापूर या महत्त्वपूर्ण लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकात हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची अति जलद रेल्वे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात अल्पवेळ थांबेल, तर सध्या कोल्हापूर ते पुणे असे अंतर धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुढील महिन्यापासून मुंबईपर्यंत धावणार असल्याचे तसेच रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे विभाग व्यवस्थापक धर्मवीर मीना, पुणे विभाग व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, पुणे आरपीएफच्या प्रियंका शर्मा यांनी जेजुरीतील माजी नगरसेविका अमिना पानसरे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे व ग्रामस्थांना दिली.

 

 

पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. ११) आळंदी (म्हातोबाची) या रेल्वे स्थानकाला भेट दिली असता जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका अमिना पानसरे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे, उद्योजक राजू पानसरे तसेच रेल्वे स्टेशन प्रभागातील ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली.

 

 

 

जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण औद्योगिक वसाहतीचे महत्त्वपूर्ण शहर आहे, रेल्वे स्थानकापासून केवळ १४ कि.मी. अंतरावर अष्टविनायकातील पहिले स्थान मोरगाव आहे. जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, गुजरात येथून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात. या मार्गावरून वंदे भारत, दिल्ली-गोवा, जोधपूर-मंगळुरू, कोल्हापूर -अहमदाबाद, महालक्ष्मी, लोकमान्यनगर -हुबळी, यशवंतपूर -हुबळी अशा अनेक लांब पल्ल्याच्या अतिजलद रेल्वेगाड्या धावतात.

 

 

भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊन धार्मिक विधीला गालबोट लागू नये याची दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत असून, पालखी सोहळा मार्गावर अंडरपास व्यवस्था पुढील काळात करण्यात येणार असून याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here