नदीकाठावर पुन्हा धक्कादायक घटना; मृत भ्रूणामुळे खळबळ

0
112

 माणदेश एक्सप्रेस न्यूज | वारजे (पुणे) :

वारजे परिसरातील मुठा नदीपात्रात गुरुवारी (दि. २८) सकाळी एका अनोळखी पुरुष जातीचे मृत भ्रूण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. स्मशानभूमीजवळील नदीपात्रात भ्रूण वाहत येताना जीवरक्षकांच्या नजरेस पडले. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत त्याला पाण्यातून बाहेर काढले व पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात दिले.

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीजवळ पालिकेकडून व अग्निशमन विभागाकडून जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नियमित टेहळणीदरम्यान नदीपात्रावर तैनात असलेल्या जीवरक्षक तुषार मुळेकर व प्रथमेश पवार यांच्या लक्षात आले की पाण्याच्या प्रवाहात काहीतरी संशयास्पद वस्तू वाहत येत आहे. नीट पाहणी केली असता ते एका भ्रूणाचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबतची माहिती लगेच वारजे पोलिस ठाणे तसेच अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद मरळ, जवान बाबूराव शितकल व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. साधारण अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर पथकाने भ्रूण पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले.

दरम्यान, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून भ्रूण उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

नदीपात्र व परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे वारजे परिसरात भीतीचे व वातावरण ढवळून निघाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here