मागील पराभव पुसून काढत दत्तात्रय पाटील यांचे दमदार पुनरागमन ; ७१७७ मतांचा कौल ; २८९५ मतांनी विक्रमी विजय

0
1

माणदेश एक्सप्रेस न्यूज ; आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालाने तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. भाजपच्या‘लाटे’ला छेद देत शिवसेनेने पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळवत आपला भगवा दणक्यात फडकावला आहे. पंचायत समितीच्या आठ जागांपैकी तब्बल पाच जागा जिंकत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले, तर जिल्हा परिषदेत चारपैकी तीन जागांवर शिवसेना–राष्ट्रवादी युतीने बाजी मारली. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले असून हा निकाल भाजपसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी आणि चर्चेचा निकाल करगणी पंचायत समिती गणातून लागला. शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे करगणीचे नेते दत्तात्रय पाटील यांनी तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवत इतिहास रचला आहे. दत्तात्रय पाटील यांना तब्बल ७१७७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार संभाजी पाटील यांना केवळ ४२८२ मतांवर समाधान मानावे लागले. तब्बल २८९५ मतांच्या फरकाने मिळवलेला हा विजय केवळ विजय नसून, तो एक राजकीय संदेश मानला जात आहे.

दत्तात्रय पाटील हे आमदार सुहासभैय्या बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. समाजकारणातून राजकारणात प्रवेश करत त्यांनी करगणी परिसरात हळूहळू आपला स्वतंत्र जनाधार निर्माण केला. सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, गावपातळीवरील प्रश्नांची जाण आणि संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व ही त्यांची खरी ओळख ठरली आहे.

मागील काळात करगणी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पत्नीला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवामुळे अनेकांनी दत्तात्रय पाटील यांची राजकीय वाटचाल संपल्याचे भाकीत केले होते. मात्र, राजकारणात पराभव हा शेवट नसतो, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. पराभवानंतर जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद दिले.याच संधीचे सोने करत दत्तात्रय पाटील यांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले.

या निवडणुकीत त्यांनी ‘घर ते घर’ प्रचाराची प्रभावी यंत्रणा राबवली. मागील निवडणुकीतील चुका ओळखून त्या दुरुस्त केल्या, प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधला आणि विकासाचा ठोस अजेंडा मांडला. भाजपची लाट असतानाही करगणी गणात शिवसेनेला एवढे प्रचंड मतदान मिळणे, हे केवळ व्यक्तीचा विजय नसून संघटनात्मक ताकदीचे प्रतीक मानले जात आहे.

या निकालामुळे आटपाडी तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकत असताना भाजपला आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. दत्तात्रय पाटील यांचा विक्रमी विजय हा येणाऱ्या काळातील तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असून, हा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी तर काहींसाठी धोक्याची घंटा ठरला आहे.

करगणी गणातून उमटलेला हा कौल म्हणजे ‘जमिनीवर काम करणाऱ्या नेतृत्वालाच जनता साथ देते’ याचा ठोस पुरावा असून, आटपाडी तालुक्यातील राजकारणात दत्तात्रय पाटील यांचे नाव आता ठळकपणे कोरले गेले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here