टेंभूच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या विट्यात : आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे दत्तात्रय पाटील (पंच) यांचे आवाहन

0
708

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन आणि शेतकरी मेळाव्याचा उद्या मंगळवारी दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. शेतकरी बंधू भगिनीं आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात झालेल्या बदलाची नोंद घ्यावी. मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी होणारा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दत्तात्रय पाटील (पंच) यांनी दिली.

यावेळी माहिती देताना दत्तात्रय पाटील (पंच) म्हणाले, टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) निघाला आहे. त्यामुळे खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील वंचित ५४ गावांना टेंभूचे पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ पूर्वनियोजित कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी होणार होता. परंतु कार्यक्रमात बदल केला असून कार्यक्रम मंगळवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होत आहे.

टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्व. आमदार अनिल बाबर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. सहाव्या टप्प्याचे काम मार्गी लागून वर्कऑर्डर निघाली आहे. कामाचा शुभारंभ १ ऑक्टोबर रोजी सुळेवाडी येथील सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

आटपाडी तालुक्यातील विभुतवाडी, गुळेवाडी, पिंपरी बुद्रुक, आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खुर्द, खांजोडवाडी, राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी (दि.) , पांढरेवाडी, उंबरगाव, घरनिकी, कुरुंदवाडी या गावांचा समावेश आहे. बहुतांश क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न नवीन योजनेत केला आहे.