
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | सांगली :
दामदुप्पट पैसे मिळतील या आमिषाला बळी पडल्याने सांगलीत एक गंभीर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. जयसिंगपूरमधील अनुजा अभिजित पवार (वय ४२, रा. शिवशक्ती कॉलनी) या महिलेची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद सांगली पोलिसांत झाली आहे.
या प्रकरणी उमेश जगन्नाथ जोशी (वय ४५), अस्मिता जोशी (वय ४०, दोघे रा. मुरली ॲपेक्स अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली) आणि संतोष सुधाकर पाठक (वय ५४, रा. श्री बंगला, दत्त मंदिरासमोर, यशवंतनगर, सांगली) या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनुजा पवार आणि संशयित यांची पूर्वीपासून ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत संशयितांनी पवार यांना “१६ महिन्यांत दुप्पट पैसे” देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्या बोलण्याला भुलून अनुजा पवार यांनी १० लाख रुपये गुंतवणूक केली.
ही घटना १५ सप्टेंबर २०२२ ते ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडली. १६ महिन्यांचा कालावधी संपूनही दामदुप्पट रक्कम मिळाली नाही. त्यामुळे पवार यांना फसवणूक झाल्याचा संशय आला.
अनुजा पवार यांनी त्यानंतर वारंवार संशयितांकडे संपर्क साधून पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी वारंवार टाळाटाळ करत वेळ काढला. शेवटी थकून भागून अनुजा पवार यांनी पोलिसांत धाव घेतली.
फिर्यादीनुसार सांगली पोलिसांनी तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून, आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारे इतरांना फसवले आहे का, याबाबत तपास होण्याची शक्यता आहे.
जयसिंगपूरच्या महिलेची १० लाखांची फसवणूक
दामदुप्पट पैसे मिळतील या आमिषाने गुंतवणूक
१६ महिन्यांत रक्कम परत न केल्याने फसवणुकीचा उलगडा
तिघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल