
माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : “ज्याला इंग्रजीतच कार्यक्रम पत्रिका हवी असेल, त्याने पासपोर्ट काढावा आणि इंग्लंडला जावे,” असा टोला भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लगावला. इंग्रजीत छापलेल्या कार्यक्रम पत्रिकेवरून त्यांनी सरकारला घरचा अहेर दिला.
गुरुवारी विधानसभेत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “मी १९९५ पासून या सदनाचा सदस्य आहे, पण आज पहिल्यांदाच मला इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मिळाली. यापूर्वी कधीही इंग्रजीत पत्रिका पाहिलेली नाही.” मराठीच्या वापराबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आणि विधानसभाध्यक्षांना इंग्रजी शब्द वगळण्यासाठी नियम समितीची बैठक घेण्याची विनंती केली.
त्यावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “९ सदस्यांनी इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका असावी अशी मागणी माझ्याकडे केली होती.”
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “आपल्याकडे नियमांनुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करता येतो, हे मला माहीत आहे. मात्र, हे महाराष्ट्राचं विधिमंडळ आहे. येथे प्रथम प्राधान्य मराठी भाषेला दिलं गेलं पाहिजे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांच्यासाठी हिंदी चालेल. पण इंग्रजीचा अट्टहास नको. इंग्रजी हवी असेल तर इंग्लंडला जावं.”
त्यांच्या या भाषणाला सत्ताधारी व विरोधी पक्षांकडूनही काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. विधानसभेत मराठी भाषेच्या वापराबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.