
माणदेश एक्सप्रेस न्यूज | तासगाव :
राजापूर (ता. तासगाव) येथील एका प्रेमीयुगुलाने कौटुंबिक वादाला कंटाळून तासगाव येथे आत्महत्या करून जीवन संपविले. गुरुवार, दि. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. सतीश महालिंग देशमाने (वय 30, मूळ रा. राजापूर) आणि अनिता रमेश काटकर (वय 35, मूळ रा. राजापूर) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेमुळे राजापूर व तासगाव परिसरात खळबळ उडाली असून, तासगाव पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद प्रक्रिया सुरू होती. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रेमसंबंधातून निर्माण झालेले वाद
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. दुसरीकडे, अनिता हिचा पती दोन वर्षांपूर्वी निधन पावला होता. त्यानंतर तिच्या एका मुलगा व एका मुलीसह ती राहात होती. याच काळात सतीश आणि अनिता यांच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले.
हा संबंध उघड झाल्यानंतर सतीशच्या कुटुंबीयांमध्ये वारंवार वाद, भांडणे होत असत. ‘तुझे नातेवाईक फार त्रास देतात, यापुढे आपले काय होणार?’ अशा कारणावरून अनिताही सतीशला सतत वाद घालत होती. दीड वर्षांपूर्वी या सततच्या वादाला कंटाळून सतीश व अनिता यांनी आपले मूळ गाव राजापूर सोडून तासगाव येथील दत्त माळ, सरस्वतीनगर येथे राहायला सुरुवात केली.
अनिताची मुले तिच्यासोबतच होती. दरम्यान, सतीशने अनिताशी दुसरा विवाह केला असल्याची चर्चा गावात होती. ते दोघेही भाड्याच्या खोलीत राहत होते. मात्र सतीश अधूनमधून आपल्या पहिल्या पत्नी व मुलांना भेटण्यासाठी राजापूरला जात असे. त्यामुळे दोघांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता.
विष प्राशन करून जीवन संपविले
गुरुवारी दुपारी सतीश व अनिता यांनी वासुंबे येथील त्यांच्या भाड्याच्या खोलीत विषारी द्रव प्राशन केले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दोघांच्या आत्महत्येच्या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणी कौटुंबिक दबाव व सामाजिक तणाव कारणीभूत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगली आहे.
पोलिसांचा पुढील तपास
घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक दबाव व सामाजिक नातेसंबंधातील वाद हे आत्महत्येचे कारण असल्याचे समोर आले आहे. मात्र घटनेमागील नेमकी कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.