आरोग्य की उद्योग? नफ्याच्या हव्यासासाठी कफ सिरपमध्ये मिसळलं विष!

0
349

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली

देशभरात एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी बाब समोर आली आहे. मुलांच्या सर्दी-खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल’ हे विषारी रासायनिक द्रव्य आढळून आले आहे. हेच द्रव्य पेंट, शाई, ब्रेक फ्लुइड्स आणि प्लास्टिकमध्ये वापरले जाते! या विषामुळे आतापर्यंत १६ निरागस बालकांचा मृत्यू झाला असून आरोग्य क्षेत्रात आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


‘डायथिलीन ग्लायकॉल’ (DEG) हे एक गंधहीन आणि रंगहीन अल्कोहोलिक रसायन आहे. याचा वापर प्रामुख्याने रेझिन, प्लास्टिसायझर्स, पेंट, शाई, लोशन, क्रीम आणि डिओडोरंट्समध्ये होतो. हे ओलावा टिकवण्यासाठी वापरले जाते, परंतु मानवाच्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. औषधांमध्ये याचा वापर फक्त 0.1 टक्क्यांपर्यंत परवानगी आहे. मात्र, ताज्या चाचणी अहवालानुसार काही सिरपमध्ये DEG चे प्रमाण तब्बल ४८ टक्क्यांपर्यंत आढळले आहे!


तामिळनाडू ड्रग कंट्रोल विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे की, काही औषधनिर्मिती कंपन्यांनी बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या सिरपमध्ये DEG चा अत्यधिक वापर केला आहे. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांनी तातडीने कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे.


या विषारी सिरपमुळे १६ मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, अनेक बालकांना गंभीर विषबाधा झाली आहे. मुलांच्या किडनीवर थेट परिणाम झाल्यामुळे त्यांचे मूत्रपिंड निकामी होत आहेत. डॉक्टरांच्या मते, “डायथिलीन ग्लायकॉल शरीरात गेल्यावर तो किडनीच्या पेशी नष्ट करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया थांबते.”


औषध कंपन्यांनी हा धोकादायक रसायन वापरण्यामागे कारण म्हणजे स्वस्त पर्याय आणि जास्त नफा. सुरक्षित रसायनांच्या तुलनेत डायथिलीन ग्लायकॉल स्वस्त असल्याने अनेक उत्पादकांनी तेच वापरले. परंतु, या “स्वार्थाच्या सिरप” मुळे निरागस बालकांचे प्राण गमवावे लागले.


जागतिक आरोग्य संघटना (WHO) यापूर्वीच DEG असलेल्या औषधांबाबत अनेक वेळा इशारा देत आली आहे. आफ्रिका, गॅम्बिया, इंडोनेशिया आणि उझबेकिस्तानमध्ये अशाच प्रकरणांमुळे शेकडो मुलांचा मृत्यू झाल्याचे WHO ने स्पष्ट केले होते. तरीही भारतात अशा औषधांचा उत्पादन व विक्री सुरूच असल्याने आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


फक्त १ ते २ मिलीलीटर DEG प्रति किलो वजनामध्ये गेल्यास तो मनुष्याच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे लहान मुलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या औषधांमध्ये याचा वापर करणे म्हणजे थेट विष देण्यासारखे आहे.


आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणावरून सर्व राज्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कफ सिरप उत्पादक कंपन्यांची यादी तयार करून त्यांच्या परवान्यांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात गुन्हेगारी कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.


डॉक्टरांनी पालकांना आवाहन केले आहे की,

  • मुलांना कोणतेही कफ सिरप देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • कंपनीचे नाव आणि बॅच नंबर तपासावा.

  • शंका आल्यास औषध वापरू नये आणि आरोग्य अधिकाऱ्यांना कळवावे.


  • १६ मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे

  • सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल ४८% पर्यंत

  • WHO ने आधीच दिला होता इशारा

  • महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये बंदी

  • औषध कंपन्यांवर कारवाईची शक्यता


“मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या औषध कंपन्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा उद्या हे विष प्रत्येक घरात पोहोचेल!”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here