
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई : करोनाचा संसर्ग देशात पुन्हा वाढताना दिसत आहे. सध्या देशभरात १००९ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. नव्याने आढळलेल्या NB.1.8.1 आणि LF.7 या व्हेरिएंटमुळे करोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले असून तेथे सध्या ४३० रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे. केरळ सरकारने सर्व रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक असून सध्या २०९ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या पूर्वस्थितीच्या आजारांची लागण होती, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत ३५ रुग्ण उपचार घेत आहेत, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २४० वर पोहोचली आहे.
दिल्लीतही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून १०४ रुग्ण सध्या गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. याशिवाय कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतूनही रुग्ण आढळले आहेत. मात्र केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या तुलनेत हे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या नव्या व्हेरिएंटबाबत जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना तज्ज्ञांकडून पुन्हा दिल्या जात आहेत