
माणदेश एक्सप्रेस न्यूज |मुंबई : एकदा थांबवलेला कोरोना विषाणू पुन्हा एकदा देशभरात डोके वर काढत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, महाराष्ट्रातही सक्रिय रुग्णांची लक्षणीय भर पडत आहे.
केवळ एका आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्या १२ वरून थेट ५६ पर्यंत पोहोचली आहे. देशभरातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या २५७ वर गेली असून, त्यात केरळ राज्य ९५ रुग्णांसह आघाडीवर, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये कोरोना संसर्गामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.
मुंबईतील स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा बीएमसीने केला आहे. डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, केईएम रुग्णालयात १४ आणि ५४ वर्षीय दोन रुग्णांचा मृत्यू झाला असला, तरी ते कोरोना व्यतिरिक्त इतर गंभीर आजारांमुळे झाले आहेत. मात्र, वाढती श्वसनविषयक लक्षणे लक्षात घेता गंभीर रुग्णांसाठी खास आरोग्य सेवा वाढवण्यात आली आहे.
मुले आणि गर्भवती महिलांसाठीही विशेष तरतुदी करण्यात आल्या असून, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये २० MICU बेड, २० बालरोग/गर्भवतींसाठी बेड आणि ६० सामान्य बेड्सची व्यवस्था आहे. कस्तुरबा रुग्णालयातही ICU वॉर्ड तयार ठेवण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून सतर्कता
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार सध्या बहुतेक प्रकरणे सौम्य लक्षणांची असली तरी वाढती संख्या पाहता राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, ICMR यांसारख्या संस्थांसोबत तातडीची बैठक घेण्यात आली आहे. गरज पडल्यास रुग्णालयांची क्षमता वाढवली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.