सोसायटी निवडणुकीत ‘बोगस मतदान’ वाद पेटला; दिव्यांग महिलेला मारहाण, पोलिसांनाही धक्काबुक्की – व्हिडिओ व्हायरल

0
406

माणदेश एक्सप्रेस | डोंबिवली | प्रतिनिधी


कल्याण ग्रामीण परिसरातील खोणी-तळोजा रोडवरील हाय-प्रोफाइल ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीदरम्यान रविवारी (१० ऑगस्ट) संध्याकाळी मोठा गोंधळ उडाला. ‘बोगस मतदान’ झाल्याच्या आरोपावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात एका दिव्यांग महिलेला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आली. परिस्थिती इतकी बिघडली की, उपस्थित पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निवडणूक शांततेत सुरू, पण शेवटच्या टप्प्यात तणाव

सोसायटी संचालक पदाच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू होती. दिवसभर शांततेत मतदान पार पडत असतानाच सायंकाळी मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात तणाव निर्माण झाला. काही उमेदवारांच्या समर्थकांनी मतदान केंद्रावर ‘बोगस मतदान’ झाल्याचा आरोप केला. रूम मालकांच्या ऐवजी भाडेकरूंनी मतदान केल्याचे एका गटाने सांगितले. या आरोपानंतर दोन गटांमध्ये जोरदार वादंग सुरू झाले.

दिव्यांग महिलेला मारहाण; पोलिसांवरही हात

वाद चिघळत गेला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. एका दिव्यांग महिलेला केवळ शिवीगाळच नाही, तर मारहाणही करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही वेळातच हे भांडण तुंबळ हाणामारीत परिवर्तित झाले. जमाव आक्रमक होऊन पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

ग्रामपंचायत सदस्याचा पती चर्चेत

या गोंधळात एका ग्रामपंचायत सदस्याचा पती देखील सहभागी असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास

मानपाडा पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध मारहाण, पोलिसांवर हल्ला आणि सरकारी कामात अडथळा आणणे या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेत सहभागी असलेल्या सर्वांचा शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व व्हायरल व्हिडिओंच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

कल्याणमधील हाय-प्रोफाइल सोसायटीतच निवडणुकीदरम्यान इतका मोठा राडा झाल्यामुळे सोसायटी निवडणुकांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांमध्ये रोष असून, निवडणूक नियमावलीत कडक तरतुदींची मागणी होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here