
माणदेश एक्स्प्रेस/मुंबई : राज्यात मुख्यमंत्रिपदावरून कायम चढाओढ लागल्याचं दिसून येते. मुख्यमंत्री बनणं प्रत्येकाचं स्वप्न असते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यात अजित पवारही उघडपणे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करत असतात. धुळवडीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांनीही अलर्ट झालं पाहिजे. सतर्क राहिले पाहिजे. आम्ही सोबत आहोत. होळीच्या या दोघांना शुभेच्छा देताना त्यांच्या सुरक्षेबाबत भूमिका मांडतोय. आमच्याकडे त्यांनी यावं, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सध्या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदाची ओढ लागली आहे. काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असं त्यांनी म्हटलं.
तर पटोलेंच्या या ऑफरवर एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर दिले. ज्यांना भगवा रंग आवडेल, परवडेल त्यांनी आमच्यासोबत यावं. भगवा रंग हा हिंदुत्वाचा आहे, सनातन धर्माचा आणि वैश्विक रंग आहे. हा भगवा रंग कुणाचा द्वेष करणारा नाही. कुणाला फसवणारा नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी भगव्या रंगात न्हाऊन आमच्यासोबत यावं त्यांना मी शुभेच्छा देतो असा चिमटा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोलेंना काढला आहे.
नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार एकत्र होते. तेव्हा गेल्यावेळी आम्ही तिघे होतो, आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणताच अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांकडे बघत डोळा मारला अन् मनातून काही जात नाही ते…असं विधान केले. तेव्हा सगळेच खळखळून हसले. त्यानंतर शिंदेंनी सरकारची नवी टर्म असली तरी आमची टीम जुनी आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झालीय, अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादाचं बरं आहे, नो टेन्शन असा टोला शिंदेंनी लगावला होता.