
नारळ पाणी हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे, पचनक्रिया सुधारवणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि इलेक्ट्रोलाइट्सची पूर्तता करणे अशा अनेक कारणांमुळे बहुतेक लोकांच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश असतो. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी पिण्याची सवयही अनेकांना आहे.
नारळ पाण्यातील पोषक घटक
पोषणतज्ज्ञांच्या माहितीनुसार, 240 मिली नारळ पाण्यात अंदाजे 60 कॅलरीज, 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 8 ग्रॅम नैसर्गिक साखर, 4% कॅल्शियम, 4% मॅग्नेशियम, 2% फॉस्फरस आणि 5% पोटॅशियम असते. मात्र त्यातील पोषक घटकांचे प्रमाण नारळाच्या आकारावर अवलंबून असते.
तज्ज्ञांचा इशारा – सर्वांसाठी नाही फायदेशीर
पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी सांगितले की, दररोज मर्यादित प्रमाणात नारळ पाणी पिणे बहुतेक लोकांसाठी चांगले असले तरी काही आरोग्य समस्यांमध्ये याचे सेवन टाळावे.
1. कमी रक्तदाब असलेले लोक
ज्यांचा रक्तदाब आधीच 110/70 किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. कारण त्याचा थेट परिणाम रक्तदाब आणखी कमी होण्यात होतो, ज्यामुळे अशक्तपणा, डोके फिरणे किंवा थकवा वाढू शकतो.
2. पचनाशी संबंधित समस्या किंवा IBS
ज्यांची पचनक्रिया कमजोर आहे किंवा आयबीएस (Irritable Bowel Syndrome) ची समस्या आहे, त्यांनी नारळ पाणी पिल्यानंतर गॅस, पोट फुगणे, जुलाब यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते.
3. सर्दी, खोकला किंवा सायनस
नारळ पाण्याचा स्वभाव थंड असल्याने, सर्दी-खोकल्याच्या काळात किंवा सायनसच्या त्रासात हे लक्षणे अधिक वाढवू शकते.
4. मधुमेहाचे रुग्ण
मधुमेह असलेल्या रुग्णांनी नारळ पाणी दिवसातून जास्तीत जास्त एकदाच घ्यावे. यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण असल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण आधीच जास्त असेल तर नारळ पाणी पूर्णपणे टाळणे श्रेयस्कर.
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ
तज्ज्ञांच्या मते सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान नारळ पाणी पिणे सर्वाधिक फायदेशीर असते. संध्याकाळी किंवा रात्री पिणे टाळावे. तसेच हवामान आणि आरोग्यस्थितीनुसारच याचे सेवन करावे.
(टीप : या लेखातील माहिती सामान्य वैद्यकीय ज्ञानावर आधारित आहे. कोणतेही आहारातील बदल करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)