
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका खास मुलाखतीत नेहमीच्या गंभीर चर्चेला थोडासा विराम मिळाला आणि रंगतदार ‘रॅपिड फायर’ सत्र रंगलं. या सत्रात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi), राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) अशा दिग्गजांबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
फडणवीसांनीही नेत्यांबद्दल आपले विचार थेट, स्पष्ट आणि कधीकधी मिश्कील शैलीत मांडले. त्यामुळे ही मुलाखत सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
शरद पवार – न उमजणारं कोडं
शरद पवारांबद्दल विचारले असता फडणवीसांनी मिश्कीलपणे उत्तर दिलं, “ते उलगडलेलं पण न समजलेलं कोडं आहेत.” पवारांच्या बहुआयामी राजकारणावर भाष्य करणारे हे विधान ऐकून उपस्थितांना हसू आलं.
अजित पवार – प्रॅक्टिकल मित्र
अजित पवारांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “अजितदादा हे प्रॅक्टिकल मित्र आहेत.” शिंदे गटासोबतच्या राजकीय समीकरणात अजित पवारांच्या प्रवेशानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळं वळण लागलं, अशा पार्श्वभूमीवर फडणवीसांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
एकनाथ शिंदे – इमोशनल मित्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल फडणवीस म्हणाले, “शिंदे हे इमोशनल मित्र आहेत.” शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे-फडणवीस यांच्यातील समीकरणं भावनिक व राजकीय नात्याची जुळवाजुळव कशी आहे, याची झलक त्यांच्या या उत्तरातून दिसून आली.
उद्धव ठाकरे – ‘कभी हां, कभी ना’
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता फडणवीसांनी चित्रपट शैलीत उत्तर दिलं – “कभी हा, कभी ना.” ठाकरे गटाशी भाजपाचे बदलते संबंध आणि मैत्री-वैमनस्याचं राजकारण या छोट्याशा वाक्यातून त्यांनी मांडलं.
मनोज जरांगे – ‘उपोषणवीर’
मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांच्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “त्यांनी इतकी उपोषणं केली आहेत की, त्यांना आता ‘उपोषण वीर’ म्हणू शकतो.”
मोदी, शाह आणि इतरांबद्दल काय म्हणाले?
नरेंद्र मोदी – “नव्या भारताचे निर्माते.”
अमित शाह – “सरसेनापती.”
नितीश कुमार – “कॉमन मॅन (सामान्य माणूस).”
डोनाल्ड ट्रम्प – “गोंधळलेला माणूस.”
सॅम पित्रोदा – “जसा शिष्य तसा गुरू, जसा गुरू तसाच शिष्य.”
अरविंद केजरीवाल – “ते कुठे आहेत?”
कुणाल कामरा – “कोण आहे हा?”
या रॅपिड फायर उत्तरांमुळे फडणवीसांनी राजकीय नेत्यांबद्दलची आपली भूमिका विनोदी, मिश्कील आणि थेट शब्दांत मांडली. विरोधकांविषयी कटाक्ष, मित्रांविषयी आपुलकी आणि पवारांविषयी कोडं – अशा तिहेरी रंगांनी रंगलेली ही मुलाखत चर्चेत राहणार हे नक्की.