
माणदेश एक्सप्रेस न्युज | नवी दिल्ली :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. विशेषत: मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुराचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी चिंतेच्या खाईत लोटले गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने २,२१५ कोटी रुपयांची रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) आधीच मंजूर केली आहे. मात्र हे अपुरे असल्याने शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की –
महाराष्ट्रातील ३१ हून अधिक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस व पुराचा फटका बसला आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले असून, लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे.
खरीप हंगामाच्या अखेरीपर्यंत (सप्टेंबर २०२५) मुसळधार पावसामुळे ५० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी समुदाय आधीच मागील संकटांमधून सावरण्याचा प्रयत्न करत असताना या आपत्तीने त्यांच्या कंबरडे मोडले आहे.
राज्य सरकारने SDRF मधून २,२१५ कोटींचे वाटप केले असले तरी, शेतकऱ्यांना पुनर्वसनासाठी आणि जीवनमान उभारण्यासाठी NDRF निधीमधून जास्तीत जास्त मदत आवश्यक आहे.
अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचंच नव्हे तर अनेक ठिकाणी जमिनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीचे पट्टे वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर जमीन पुनर्संचयित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांचे घरदार, जनावरे व जगण्याची साधने वाहून गेल्याने त्यांच्यासमोर पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर तातडीने मदत मिळण्याचीही गरज आहे. यासाठी फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे एनडीआरएफ निधीतून भरीव पॅकेज देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत झालेल्या नुकसानीची व्याप्ती पाहता केंद्राने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या हातात मदत पोहोचवणं अत्यावश्यक ठरतं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, “शेतकऱ्यांना मदत देताना कोणतेही निकष आड येऊ नयेत. सरकार प्रत्येक बाधित कुटुंबाच्या पाठीशी उभं आहे. मात्र या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.”
महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग पुन्हा उभा राहण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मदत जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.