मुख्यमंत्री मंत्र्यांवर नाराज? सुप्रिया सुळेंचं विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय!

0
19

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे | २६ जुलै २०२५

राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांवर थेट निशाणा साधत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मंत्र्यांवर नाराज असल्याचं गंभीर विधान केलं आहे. त्यामुळे येत्या काळात काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

“मुख्यमंत्री नाराज आहेत” – सुप्रिया सुळे यांचा दावा

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दिल्लीत राज्याबाबत खूप चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या वागणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस नाराज आहेत. मित्रपक्षांवरही नाराजी आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशभरात वाईट जाते आहे.”

 

 

रमी खेळणाऱ्या मंत्र्यामुळे महाराष्ट्राची लाज

गेल्या काही दिवसांत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “दिल्लीतले खासदार मला विचारत होते, ‘कोण आहे हा मंत्री जो रमी खेळतोय?’ अशी चर्चा दिल्लीत सुरु आहे. ही महाराष्ट्राची बिकट अवस्था आहे. कुठलीही घटना घडली की तिचं रूपांतर राष्ट्रीय चर्चेत होतं.”

 

 

“राजीनामा स्वतः देत नाहीत” – सुळे यांची टीका

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ज्यावेळी पहिला व्हिडिओ समोर आला त्यावेळीच कोकाटेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता. आता सांगावं लागतंय, ‘राजीनामा द्या’. दिल्लीशिवाय राजीनामे होतच नाहीत.” यामधून सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

 

 

लाडकी बहीण योजनेवर गंभीर आरोप

‘लाडकी बहीण’ योजनेबाबतही सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. “काही ठिकाणी पुरुषांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. हे फॉर्म कुणाकडून भरले गेले? यामागे मोठं षडयंत्र आहे. एसआयटी व ईडीच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here