
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जत तालुक्यासाठी स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याने तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या वेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आम सदाभाऊ खोत, माऊली हळणवर यांचीही उपस्थिती होती.
जत तालुका हा कायम दुष्काळग्रस्त असून, मोठ्या प्रमाणावर नागरिकांना वाहतूक सुविधांसाठी सोलापूर, सांगली किंवा इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळे जत तालुक्याला स्वतंत्र आरटीओ मंजूर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जतसाठी स्वतंत्र आरटीओ मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, करसंदर्भातील सेवा इत्यादी कामांसाठी लांब अंतर प्रवास करण्याची गरज भासणार नाही. परिणामी, दुष्काळग्रस्त भागातील परिवहन सुविधा सुलभ होऊन स्थानिक विकास प्रक्रियेस चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “जतच्या जनतेसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जतच्या जनतेच्या भावना ओळखून हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”


