
माणदेश एक्सप्रेस न्युज | सांगली :
उसने घेतलेल्या पैशांच्या परतफेडीच्या वादातून सांगली शहरात शनिवारी सायंकाळी गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत शंकर बाबर (वय 49, रा. सुतार प्लॉट) याच्यावर कोयता व चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी बाबरची भाची निलंबित पोलिस कोमल रामचंद्र धुमाळ हिच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हाणामारीच्या काही वेळानंतरच छोट्या बाबर व त्याची पत्नी रेखा यांच्याविरुद्धही एका महिलेस मारहाण व विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
शनिवारी सायंकाळी बाबर व त्याची पत्नी रेखा हे घरी असताना भाची कोमल धुमाळ, वैशाली धुमाळ, अमित धुमाळ, ओंकार लोहार व सौरभ सादरे हे त्यांच्या घरासमोर आले. कोमलकडून उसने घेतलेले एक लाख रुपये मागणीसाठी आलेल्या आरोपींना बाबरने पैसे परत दिल्याचे सांगितले. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला.
वाद चिघळताच कोमल धुमाळ हिने काठीने बाबरची पत्नी रेखा हिच्या डोळ्यावर मारले. तर अमित धुमाळ व ओंकार लोहार यांनी कोयत्याने बाबरच्या डोक्यावर वार केला. सौरभ सादरे याने चाकूने त्याच्या हातावर वार करून जखमी केले. यावेळी वैशाली धुमाळ हिने रेखाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले, असे बाबरने दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेत छोट्या बाबर व पत्नी रेखा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर काही तासांतच छोट्या बाबर व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला. सांगलीतील एका इमारतीच्या जिन्यावर बाबर चार मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी पीडित महिलेने त्यांना “येथे थांबू नका” अशी सूचना केली. त्यावर बाबर संतापला. त्याने आपल्या मित्र विनायक येडके याला महिलेच्या अंगावर ढकलून दिले.
यानंतर काही वेळाने पुन्हा महिलेवर शिवीगाळ करत तिला जाब विचारला असता, बाबर दांपत्याने महिलेची लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर तिचा विनयभंगही केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
एका बाजूला छोट्या बाबरवर हल्ला होऊन तो गंभीर जखमी झाला असताना दुसरीकडे त्याच्याविरुद्ध महिलेला मारहाण व विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तपास सुरू केला असून घटनाक्रमाची सविस्तर चौकशी केली जात आहे.