
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर :
ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या शासकीय निर्णयावरून राज्यातील वातावरण तापलं असताना, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी आज नागपूरमध्ये घेतलेल्या बैठकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थेट सवाल करत राजकीय वर्तुळात नवी खळबळ उडवली आहे.
भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी मंडल आयोग लागू व्हावा म्हणून शिवसेना सोडून शरद पवारांच्या सोबत आलो. आज जर आमच्या समाजाचं आरक्षण धोक्यात असेल तर आम्ही लढायचं नाही का? पवार साहेब, तुम्हीच सांगा आम्हाला बोलायला नको का?”
लातूरमध्ये झालेल्या त्यांच्या हालचालींमुळे आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे संकेत मिळाले होते. आज नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पवारांना लक्ष्य केले.
भुजबळ म्हणाले, “शरद पवार साहेबांचा मी आदर करतो, पण त्यांनी दोन वेळा असं म्हटलं की समित्यांमध्ये समतोल असावा. मग मराठा समितीत इतर समाजाचे नेते आहेत म्हणता, पण खरेतर ती समिती उद्धव ठाकरे यांच्या काळापासून अस्तित्वात आहे. त्यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री त्यात होते. मग त्यावेळी तुम्ही का बोलला नाहीत?”
भुजबळ यांनी पवारांवर अधिक टीका करताना विचारलं, “सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते तेव्हा पवार साहेब गैरहजर का राहतात? जर सामाजिक सलोखा निर्माण करायचा असेल, तर पवारांनी त्या बैठकीला हजर राहून स्पष्ट भूमिका घ्यायला हवी.”
मराठा समाजाला आधीच अघोषित राजकीय आरक्षण असल्याचा दावा करत भुजबळ म्हणाले,
“मराठा समाजाला ओपनमध्ये संधी आहे, शिवाय मोदींनी आणलेल्या EWS मधून 8 टक्के आरक्षण आहे. तरीदेखील आता 27% ओबीसी आरक्षणातून वाटा मागितला जातोय. मग आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही का?”
भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या विविध जातींच्या नुकसानाचा मुद्दा ठळक केला.
“मराठा एक जात आहे, पण ओबीसीमध्ये तब्बल 374 जाती आहेत. कुणबी, माळी, वंजारी अशा समाजाच्या वतीने आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दोन-चार दिवसांत त्यावर सुनावणी होणार आहे. मग प्रत्येक जातीचं होणारं नुकसान आम्ही थांबवणार नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
भुजबळ यांनी पवारांना थेट आव्हान दिलं की,
“जर खरंच मराठा समाजाला आरक्षण हवं असेल तर सांगा की ते ओबीसीमध्येच पाहिजे का? शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षा यामध्ये आज ओबीसी विद्यार्थ्यांचे कट ऑफ पॉईंट्स वर आहेत. मराठा समाजाला जर फायदा द्यायचा असेल, तर तो वेगळ्या मार्गाने द्या; पण ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू नका.”
आज नागपूरमध्ये होणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच भुजबळांनी शरद पवारांवर निशाणा साधून ओबीसी समाजाच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्याने, राज्याच्या राजकारणात नव्या वादळाची चाहूल लागली आहे.


