चेन्नईचा विजय पण जल्लोष मुंबईच्या समर्थकांचा

0
195

माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : आयपीएल 2025चा 67 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. सीएसकेने हा सामना 9 चेंडू शिल्लक असताना 83 धावांनी जिंकला.

 

नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो आयुष म्हात्रेने पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले. आयुषने सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. त्याने अर्शद खानविरुद्ध एका षटकात 28 धावा ठोकल्या आणि खळबळ उडवून दिली. चौथ्या षटकात आऊट होण्यापूर्वी, आयुषने 17 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या आणि डेव्हॉन कॉनवेसोबत 44 धावांची सलामी भागीदारी केली. धमाकेदार सुरुवातीनंतर, धावगती कायम ठेवण्याचे काम उर्विल पटेलने केले, ज्याने 19 चेंडूत 37 धावा केल्या आणि 10 व्या षटकात 107 धावांवर आऊट झाला.

 

कॉनवेने सुरुवातीला वेळ घेतला, पण नंतर त्यानेही चालू हंगामातील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. कॉनवेने 35 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. तर शिवम दुबेने 8 चेंडूत दोन षटकारांसह 17 धावांचे योगदान दिले. 14 व्या षटकात, चेन्नईने 156 धावांवर चौथी विकेट गमावली. येथून, डेवॉल्ड ब्रेव्हिस आणि रवींद्र जडेजा या जोडीने डाव पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. ब्रेव्हिसने कोणतीही कसर सोडली नाही आणि वेगवान गतीने धावा केल्या. ब्रेव्हिसने फक्त 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि शेवटच्या षटकात बाद होण्यापूर्वी 23 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह 57 धावा केल्या. तर जडेजा 18 चेंडूत 21 धावा काढून नाबाद राहिला. गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

 

231 लक्ष्याचा पाठलाग करताना या हंगामात गुजरात टायटन्सची सुरुवात पहिल्यांदाच इतकी खराब झाली, कारण त्यांनी पॉवरप्लेमध्येच कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्या विकेट गमावल्या. शुभमन आणि रदरफोर्ड यांना अंशुल कंबोजने आऊट केले. तर बटलरची विकेट खलील अहमदने घेतली. 30 धावांत तीन विकेट गमावल्यानंतर, साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी चौथ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी करून गुजरात टायटन्सला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रवींद्र जडेजाने एकाच षटकात दोघांनाही बाद करून गुजरातला पराभवाच्या छायेत ढकलले, सुदर्शनने 28 चेंडूत 6 चौकारांसह 41 धावा हा सर्वोच्च धावसंख्या केला. येथून गुजरात टायटन्सला त्यांचा डाव सावरता आला नाही. त्यांना पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. चेन्नई सुपर किंग्जकडून फिरकी गोलंदाज नूर अहमद आणि वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here