
माणदेश एक्सप्रेस न्यूज | कोकरूड :
चारित्र्याच्या संशयावरून संतापलेल्या पतीने स्वतःच्या पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून दिल्याची थरकाप उडवणारी घटना शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथे घडली. गुरुवारी (दि. 11) रात्री ही घटना घडली असून गंभीर स्वरूपाच्या भाजल्या गेलेल्या पत्नीचा रविवारी (दि. 14) सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक करून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिलेचे नाव अनिता संजय बेंगडे (वय 40, रा. सावंतवाडी, ता. शिराळा) असे आहे. तर आरोपीचे नाव संजय बयाजी बेंगडे (वय 53) असे असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी येथे संजय आणि अनिता बेंगडे राहत होते. त्यांचा मुलगा मुंबईत कामानिमित्त स्थायिक असल्याने घरात दोघेच राहायचे. संजयला दारूचे व्यसन असून तो वारंवार पत्नीस मारहाण करत असे. त्याचबरोबर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालत असे.
गुरुवारी रात्री अनिता घरात स्वयंपाक करीत असताना संजयने पुन्हा वाद घातला. वाद वाढताच त्याने शिवीगाळ व मारहाण केली. चूल पेटवण्यासाठी घरात आणलेले डिझेल त्याने थेट अनिता यांच्या अंगावर ओतले आणि काडीपेटी लावून त्यांना पेटवून दिले. अचानक पेट घेतल्याने अनिता जोरजोराने ओरडू लागल्या व जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावत गेल्या. शेजाऱ्यांनी धाव घेऊन पाणी व कापड टाकून आग आटोक्यात आणली.
या घटनेत अनिता गंभीर स्वरूपाच्या 70 टक्के भाजल्या होत्या. त्यांना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
आगीत भाजल्यामुळे प्रकृती गंभीर असली तरी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन अनिता यांचा जबाब नोंदवला होता. यात त्यांनी स्वतःवर झालेला अत्याचार व पतीनेच डिझेल टाकून पेटविल्याचे स्पष्ट केले. या जबाबावरूनच पोलिसांनी आरोपी संजय बेंगडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील व सहायक निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी संजय बेंगडे याला अटक करण्यात आली असून सोमवारी (दि. 15) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.