राऊत म्हणाले, “दोन बंधू मराठीच्या प्रश्नावर एकत्र आले, तर यात कोणालाही समस्या नसावी. हा इंडिया आघाडीचा विषय नाही, त्यामुळे दिल्लीमध्ये यावर चर्चा करण्यासारखे काही नाही. परप्रांतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांची आता कोणतीही भूमिका नाही. मात्र, मराठीचा मुद्दा नाकारला, तर प्रतिक्रिया येणारच.”
दिल्लीतील अलीकडच्या बैठकीबाबत भाष्य करताना राऊतांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. “आम्ही दिल्लीत जातो ते आमच्या अटींवर, कोणाची लाचारी पत्करून नाही. लाचारांचा गट तुमच्यासोबत आहे, जे शेपट्या हालवत दिल्लीत फिरतात. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही आघाडी झालेली नसल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले. काल वरळीत झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात राऊत म्हणाले, “आम्ही कोणत्याही संघर्षासाठी तयार आहोत.”
निवडणूक आयोगाविरोधातील लढा सुरूच राहील, तसेच राहुल गांधींबाबत आम्ही आशावादी आहोत, असेही राऊतांनी सांगितले. यावेळी दिल्ली बैठकीत उद्धव ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवण्यात आल्याच्या चर्चेवर भाष्य करताना, त्यामागील कारण त्यांनी स्पष्ट केले आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली.