पंढरपूरात चंद्रभागेचा रौद्ररुप, इशारा पातळी ओलांडली; शेकडो कुटुंबांचे स्थलांतर

0
295

माणदेश एक्सप्रेस न्यूज | पंढरपूर :
उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पंढरपूर येथील चंद्रभागा नदीला भीषण पूर आला आहे. नदीने इशारा पातळी ओलांडल्याने वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली असून, नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. या परिस्थितीत पालिका प्रशासनाने तत्काळ हालचाल करत जवळपास ३५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

पालिका मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली असली तरी धरणांमधील पाण्याचा विसर्ग कायम राहिल्यामुळे चंद्रभागा नदीची पातळी झपाट्याने वाढली आहे. वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून सकाळी ७ वाजता नीरा नदीत केवळ १५ क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र, दुसरीकडे उजनी धरणातून सकाळी १० वाजता भीमा नदीत तब्बल १ लाख ४० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.

भीमा–नीरा संगमावर प्रचंड पाणी

नीरा आणि भीमा नद्या अकलूज येथे एकत्र येतात. येथे सकाळी १० वाजेपर्यंत तब्बल १ लाख ७८ हजार क्युसेक पाणी वाहत होते. या संगमाचा थेट परिणाम पंढरपूरमधील चंद्रभागा नदीवर दिसून आला. चंद्रभागा नदीत एकट्या १ लाख २० हजार क्युसेक पाणी वाहत असून यामुळे नदीने इशारा पातळी पार केली आहे.

मंदिरे पाण्याखाली, झोपडपट्ट्यांत पूर

नदीच्या वाढत्या पातळीमुळे वाळवंटातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच, शहरातील नदीकाठच्या झोपडपट्टी भागात पाणी घुसले असून तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतराची मोहीम सुरू करण्यात आली. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत गुरुवारी सकाळपर्यंत ३५० कुटुंबे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली.

या नागरिकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विस्थापित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रशासनाचे आवाहन

पंढरपूर शहरात अजूनही पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. उजनी धरणातून सुरू असलेला मोठ्या प्रमाणातील पाण्याचा विसर्ग लक्षात घेता सायंकाळपर्यंत शहरातील काही भागात पाणी शिरण्याचा धोका आहे. याबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले, “नदीकाठच्या भागातील नागरिकांनी अनावश्यक धोकादायक भागात जाण्याचे टाळावे. प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे. सर्वांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here