
चाकण (प्रतिनिधी) :
पोलिसांवरच हल्ला करण्याचे धाडस एका सराईत गुन्हेगाराने दाखवले. चाकणजवळील खराबवाडी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ पोलिस अंमलदारावर सत्तूरने वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक अशोक जंगले (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड) असे असून याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस अंमलदार शिवाजी वसंत मरकड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी परिसरात किरकोळ भांडण झाले होते. त्या घटनेत दीपक जंगले हा हातात सत्तूर घेऊन शिवीगाळ करत लोकांना धमकावत होता. स्थानिकांनी घाबरून तातडीने १०८ आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून याची माहिती पोलिसांना दिली.
सूचना मिळताच पोलिस अंमलदार शिवाजी मरकड हे सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी जंगले हा हातात सत्तूर घेऊन उभा होता. पोलिसांना पाहताच त्याने थेट मरकड यांच्यावर हल्ला चढवला. “तुला जिवंत सोडणार नाही,” अशा
सुदैवाने पोलिस अंमलदार मरकड यांनी वार चुकवला. त्यांनी तत्काळ धाडस दाखवत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंगलेने झटापट करत मरकड यांच्या हातास चावा घेऊन दुखापत केली. तरीही पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिस दलाने मोठा संयम दाखवला. थोड्या वेळ चाललेल्या नाट्यमय घटनांनंतर अखेर सराईत गुन्हेगार जंगलेला जेरबंद करण्यात यश आले.
दीपक जंगले याच्यावर यापूर्वी आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो सतत गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून परिसरात दहशत माजवण्याचे प्रकार तो करत होता. स्थानिक नागरिक अनेकदा त्याच्या त्रासाला कंटाळले होते.
अटक करण्यात आलेल्या जंगलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक करीत आहे. पोलिस अंमलदारावर हल्ला करण्याच्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे.