
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली :
लिलावातून मोटार मिळवून देतो असे सांगून सांगलीतील एका नामांकित मेडिकल व्यावसायिकाची तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भिवंडी (जि. ठाणे) आणि सांगलीतील दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही फसवणूक महावीर काशाप्पा आलासे (वय ५५, रा. शिंदे मळा, सांगली) यांच्यासोबत घडली असून, संशयितांची नावे अनिल शिवराम कोंडा (रा. पद्मानगर, भिवंडी, जि. ठाणे) व गणेश सुरेश पाटील (रा. अरिहंत कॉलनी, सांगली) अशी आहेत. आलासे यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावीर आलासे यांची ओळख सुमारे वर्षभरापूर्वी गाड्यांची खरेदी-विक्री करणारा गणेश पाटील याच्याशी झाली होती. त्या वेळी आलासे यांनी स्वतःच्या वापरासाठी गाडी घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पाटील याने अथर्व मोटर्सचा मालक असलेल्या अनिल कोंडा याच्याकडे लिलावात गाडी उपलब्ध असल्याचे सांगितले.
गाडीचे फोटो दाखवल्यानंतर आलासे यांना ती आवडली. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवली.
२३ ऑक्टोबर २०२० रोजी – २ लाख रुपये
२९ ऑक्टोबर २०२० रोजी – ५ लाख रुपये
१० नोव्हेंबर २०२० रोजी – ५ लाख रुपये
अशा प्रकारे एकूण १२ लाख रुपये अनिल कोंडा यांच्या बँक खात्यात जमा केले.
रक्कम दिल्यानंतर पाटील याने आलासे यांना, भिवंडी येथे प्रत्यक्ष लिलावाला उपस्थित राहावे लागेल असे सांगितले. परंतु ११ नोव्हेंबर रोजी आलासे यांनी कोंडा याला कॉल केला असता त्याने फोन उचलला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही गाडी न मिळाल्याने आलासे यांनी कोंडा याला जाब विचारला. त्यावेळी कोंडा याने पाटीलच मोटार व पाच लाख रुपये घेऊन गेल्याचे सांगून जबाबदारी झटकली.
दरम्यान, गणेश पाटील याच्याकडे विचारणा केली असता त्याने सतत “आज-उद्या पाहू” असे म्हणत टोलवाटोलवी केली. एवढेच नव्हे तर त्याच्या घराकडे वारंवार विचारणा करण्यासाठी गेल्यावर त्याच्या पोलिस वडिलांनीही पुन्हा इथे फिरकू नका, असा इशारा दिला.
सततच्या टाळाटाळीनंतर दोघांनी एकत्रितपणे फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने अखेर महावीर आलासे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अनिल शिवराम कोंडा व गणेश सुरेश पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.