“बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. यातील आरोपी अटक असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. शाळेने संबंधितांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे”, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.
तर भाजप नेत्या नवनीत राणा यांनीही बदलापूर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूर प्रकरणी आरोपीला भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केले आहे. बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं, त्यात अशा राक्षसी विचारधारेच्या लोकांना भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे, असे नवनीत राणा यांनी म्हटले.
आमचे गृहमंत्री सक्षम आहे. मात्र अशा लोकांना कायद्याची भीती राहिली नाही. ज्या हातावर महिलांनी राखी बांधली, त्या भावांनी महिलांचं रक्षण केलं पाहिजे. त्यासाठी कायदा कडक बनला पाहिजे. या लोकांना कायद्याची भीती त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे. तसेच असे कृत्य करणाऱ्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. मला एक महिला व आई म्हणून खूप दुःख होत आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.
“हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार”
तसेच भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार, असे म्हटले आहे. बदलापुरात शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असेल, याची कल्पना करू शकते. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही. राज्याचे गृहमंत्री आणि गृहखाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल, तशा सूचना पोलीस खात्याला दिल्या गेल्या आहेत. या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार, असे चित्रा वाघ म्हणाल्या.