
माणदेश एक्सप्रेस न्यूज|पालघर : राज्यात शाळा प्रवेशोत्सव साजरे होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित कातकरी समाजातील शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाची गंभीर नोंद घेतली आहे. “ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करावे आणि गरज भासल्यास थोडी जोर-जबरदस्ती करून का होईना, पण ही मुले शाळेत गेलीच पाहिजेत,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
ते पालघर जिल्ह्यातील मनोर येथे आयोजित ‘धरती आबा’ लोकसहभाग मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. या उपक्रमाचा उद्देश आदिवासी समाजाच्या जीवनात मूलभूत परिवर्तन घडवणे असा आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विवेक पंडित, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी दुर्वेस शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करून शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेतला. “गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक-पालक यांच्यात सुसंवाद हेच शिक्षणव्यवस्थेचे खरे बळ आहेत,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील ७ ते ८ हजार प्रलंबित वनहक्क पट्ट्यांचे वाटप १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. वाढवण बंदरामुळे पालघर जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन होणार असून, स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.