
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या स्थलांतरावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ सुरू आहे. कोल्हापूरजवळील नांदणी मठात तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केलेल्या महादेवी हत्तीणीला अलीकडेच गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवण्यात आलं. यानंतर कोल्हापूरमधील नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले असून, हत्तीणीला परत आणण्याची मागणी अधिकच तीव्र होत चालली आहे.
आज या वादग्रस्त विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस उपस्थित राहण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी देखील दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना थेट राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.
“सरकारने दिशाभूल केली आहे” – राजू शेट्टी
राजू शेट्टी म्हणाले, “महादेवी हत्तीणीसंदर्भात सादर करण्यात आलेले वैद्यकीय अहवाल दिशाभूल करणारे आहेत. एका रिपोर्टमध्ये सांगितलं जातं की तिला मल्टिपल फ्रॅक्चर आहेत, संधिवात आहे, तर दुसऱ्या नऊ रिपोर्टमध्ये वेगळीच माहिती दिली जाते. मग खरे कोण? महाराष्ट्र शासनाचे अधिकारी का खोटं बोलत आहेत?”
ते पुढे म्हणाले, “सरळसरळ जनतेची फसवणूक केली गेली आहे. जर वनतारामध्ये नेलेली ही हत्तीण आनंदात असेल तर शासन तिचे व्हिडीओ का लपवत आहे? फक्त माधुरी हत्तीणच का? इतर देवस्थानांच्या हत्तींचं काय?”
“आमचा हत्ती आम्हाला परत पाहिजे!”
राजू शेट्टी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आम्हाला आमचा हत्तीच पाहिजे आहे. केवळ कुणाला हत्ती हवा म्हणून आम्ही आमचं ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व असलेलं हत्ती देणार नाही. सरकारने वेळोवेळी तपासण्या कराव्यात, पण कोल्हापूरच्या जनतेची भावना दुर्लक्षित करून कोणताही निर्णय घेता कामा नये.”
कोल्हापूरकरांचा वाढता रोष
महादेवी हत्तीणीवर कोल्हापूरकरांचे प्रेम विशेष आहे. गेल्या तीन दशकांपासून नांदणी मठातील उत्सव, धार्मिक विधी आणि सणांमध्ये तिचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे तिचं अचानक झालेले स्थलांतर कोल्हापूरकरांना खटकले आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून ती परत आणण्याची मागणी केली आहे.
वनताराकडून व्हिडीओ शेअर
दरम्यान, वनताराकडून महादेवी हत्तीणीचे रोजचे व्हिडीओ शेअर करण्यात येत आहेत. तिच्या दिनक्रमाची माहिती, आरोग्य अहवाल आणि निगा राखण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली जात आहे. काहींचं म्हणणं आहे की, वनतारामध्ये तिची योग्य काळजी घेतली जात आहे, त्यामुळे तिला परत आणण्याची गरज नाही.
पुढे काय?
आता या संपूर्ण प्रकरणावर मंत्रालयातील बैठकीत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी, जनतेचा रोष आणि राजकीय नेत्यांचा दबाव लक्षात घेता हे प्रकरण अधिकच गंभीर होत चाललं आहे.