
माणदेश एक्सप्रेस न्युज/तासगाव : आळते (ता. तासगाव) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर सिंचन प्रकल्पाच्या प्रस्तावासंदर्भात प्राथमिक प्रस्ताव पाठवण्यासाठी, कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तसेच प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना आळते (ता. तासगाव) येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई काल गुरुवारी करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलीम यासिन मुजावर (वय 38) असे लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे विहीर सिंचन खुदाई प्रकल्प मंजूर झाला आहे. त्या प्रस्तावाचे प्राथमिक कागदपत्रे सादर करणे, कार्यारंभ आदेश काढणे, मस्टर मागवणे आणि प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सहकार्य करण्याच्या मोबदल्यात मुजावर याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने सांगली एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.
एसीबीने गुरुवारी सापळा रचून ही कारवाई केली. त्यात मुजावर याने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्याच्याविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सांगली एसीबीचे उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलिस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे आणि त्यांच्या पथकाने केली.