खानापूर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी ब्रम्हानंद पडळकर सज्ज !

0
68

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : देशातील लोकसभेच्या निवडणुकी संपन्न झाल्या आहेत. आता राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. इच्छुकांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. खानापूर मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचे बंधू व सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी आगामी विधानसभेचा गड सर करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

खानापूर मतदार संघ हा कॉंग्रेसच्या विचारसरणीचा मतदार संघ. या मतदार संघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्ष व शिवसेना असे प्राबल्य राहिले आहे. परंतु असे असले तरी देखील, या मतदार संघावर १९९५ नंतर विट्याच्या स्व.अनिलभाऊ बाबर व सदाशिवराव पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे. २००४ व २००९ मध्ये सदाशिवराव पाटील यांनी एकवेळ अपक्ष व एकवेळ कॉंग्रेसमधून विजय प्राप्त केला. त्यानंतर २०१४ व २०१९ साली स्व.अनिलभाऊ बाबर यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत विजय प्राप्त केला.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामती मध्ये निवडणूक लढविल्याने या ठिकाणी त्यांनी अनिलभाऊ बाबर यांना पाठींबा दिला होता. परंतु निवडणुकीनंतर बाबर व पडळकर गटामध्ये दुरावा निर्माण झाला होता. आम.गोपीचंद पडळकर यांनी विटा येथे भाषणात बोलताना २०२४ साली या मतदार संघामध्ये भाजपचा आमदार निवडून येणार असल्याचे जाहीरपणे सांगताना,शिवसेनेचे आमदार असलेले अनिलभाऊ बाबर हे भाजप उमेदवाराला पाठींबा देणार असल्याचे सांगत, तशी चर्चा देखील बंद खोलीत बारामती येथे झाली असल्याचे सांगितले होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर मतदार संघातील घाटमाथ्यावरील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात निधी देवून समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तर ब्रम्हानंद पडळकर यांनी देखील समाजकल्याण सभापती असताना खानापुर मतदार संघामध्ये तब्बल ३०० कोटी रुपयापेक्षा जादा निधी देवून अनेक विकास कामे केली आहेत. मदार गोपीचंद पडळकर यांनी जत येथे बोलताना खानापूर विधानसभेसाठी ब्रम्हानंद पडळकर हे इच्छूक असल्याचे जाहीर कबुली दिली होती.

खानापूर मतदार संघामध्ये २०१४ साली भाजपकडून निवडणूक लढविताना गोपीचंद पडळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. तर, २०१९ ला अनिलभाऊ बाबर यांना पाठींबा देताना, २०२४ साली अनिलभाऊ बाबर त्यांनी बारामती येथे आपल्याल्या शब्द दिला असल्याचे त्यांनी अनेकवेळा जाहीर राजकीय मंचावरून याची आठवण देखील करून दिली आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीसाठी मतदार संघातून भाजप कडून इच्छुक असणाऱ्या ब्रम्हानंद पडळकर यांनी मतदार संघामध्ये दौरे सुरु केले असून नागरिकांना अडी-अडचणी जाणून घेत आहेत.

 

आम. पडळकर यांनी केलेली विकासकामे त्याच बरोबर स्वत: ब्रम्हानंद पडळकर यांनी समाजकल्याणच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान असणार, याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले असले तरी, त्यांनी मात्र विरोधकांना धूळ चारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार संघामध्ये कमळ फुलविण्यासाठी ब्रम्हानंद पडळकर हे सज्ज झाले असून, त्यांचे कार्यकते देखील कामाला लागले आहेत.