बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘जाट’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक गोपीचंद यांनी आज त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिग्दर्शक गोपीचंद यांनीही सोशल मीडियावर ‘जाट’चे पोस्टर शेअर करून रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
सनी देओलचा सिनेमा ‘जाट’ १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. गोपीचंद यांनी सोशल मीडियावर लिहिले की, प्रत्येकाचा आवडता ॲक्शन सुपरस्टार सनी देओल येत आहे. ॲक्शन चित्रपटाद्वारे हा अभिनेता मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाला आहे. ‘जाट’ १० एप्रिलला हिंदी, तेलुगू आणि तमीळमध्ये जगभरात रिलीज होणार आहे. खूप एण्टरटेन्मेंट होणार आहे.
विशेष म्हणजे सनी देओलचा जाट हा चित्रपटाचा अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचा जॉली एलएलबी ३ या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. याशिवाय अजित कुमारचा गुड बॅड अग्ली, धनुषचा चित्रपट इडली कडई, प्रभासचा द राजा साब हे देखील १० एप्रिलला प्रदर्शित होत आहेत.
या ॲक्शन एंटरटेनर ‘जाट’मध्ये अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत आहे. सनीसोबत या चित्रपटात रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग, रेजिना कॅसांड्रा, सैयामी खेर आणि स्वरूपा घोष सारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. पुष्पा २ सोबत जाटचा टीझर १२,५०० स्क्रीनवर दाखवण्यात आला. हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा ॲक्शन पॅक्ड टीझर पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की सनी देओल खरोखरच भारतीय सिनेमातील सर्वोत्तम ॲक्शन हिरो आहे.