
वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका खासगी अंतराळ कंपनीचे ‘ब्ल्यू घोस्ट’ हे यान 2 मार्चला चंद्रावर यशस्वीपणे उतरले आणि आता त्याने चंद्रावरील सूर्योदयासह अनेक नेत्रदीपक छायाचित्रे टिपली आहेत. ही मोहीम ‘नासा’ आणि व्यावसायिक अंतराळ संशोधन संस्था ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ यांच्या सहकार्याने राबवली जात आहे.
यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे, हे उद्दिष्ट आहे. ब्ल्यू घोस्ट हे चंद्रावर उतरलेले दुसरे खासगी लँडर आहे. याआधी फेब्रुवारी 2024 मध्ये ‘इंट्यूटिव्ह मशिन्स’ च्या ‘ओडिसियस’ लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले होते. ब्ल्यू घोस्ट मिशन 1, ज्याला ‘घोस्ट रायडर्स इन द स्काय‘ असे नाव देण्यात आले आहे, ही फायरफ्लाय एअरोस्पेसची 2028 पर्यंत नियोजित तीन चंद्र मोहिमांपैकी पहिली मोहीम आहे. 15 जानेवारी 2025 रोजी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून ब्ल्यू घोस्टने यशस्वी प्रक्षेपण केले होते. ब्ल्यू घोस्टने आपले लँडिंग ‘मारे क्रिसियम’ या चंद्राच्या निअर-साईडवरील (पृथ्वीच्या दिशेने असलेला भाग) एका 300 मैल (480 कि.मी.) रुंद खोर्यापत केले. लँडिंगनंतर, लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावरून घेतलेल्या छायाचित्रांचे संकलन केले आहे, जे आगामी अंतराळ संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.