
अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या मृदू स्वभावासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. मात्र तिचा आगामी सिनेमा ‘मैसा’मधील लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रक्तबंबाळ चेहरा, हातात धारदार शस्त्र आणि नजरेत क्रोध – अशा भीषण अवतारात रश्मिका पहिल्यांदाच झळकली आहे.
‘मैसा’ हा रश्मिकाचा ‘पुष्पा २’नंतरचा बिग बजेट पॅन इंडिया सिनेमा असणार आहे. पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. या सिनेमाची निर्मिती अनफॉर्म्युला फिल्म्सच्या बॅनरखाली होत असून, तो एका स्त्री योद्धीच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे.
तिने स्वतः सिनेमाच्या लूकसोबत एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे – “मी नेहमीच तुम्हाला काहीतरी नवीन, वेगळं आणि थरारक देण्याचा प्रयत्न करते… आणि हा प्रोजेक्ट त्यातलाच एक! अशी भूमिका आणि अशी दुनिया जिथे मी कधी गेले नव्हते. माझं असं रूप मीही कधी पाहिलं नव्हतं… आणि ही तर फक्त सुरुवात आहे!”
‘मैसा’ हा चित्रपट एक भावनिक अॅतक्शनपट असून, गोंड आदिवासी समुदायाच्या अनोख्या जगात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. स्त्री शक्ती, संघर्ष, सन्मान आणि न्यायाच्या लढ्याचा हा चित्रपट आजवर न पाहिलेल्या कथानकातून उलगडला जाणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
‘मैसा’व्यतिरिक्त रश्मिका लवकरच आयुष्मान खुरानासोबत ‘थामा’ या हॉरर-कॉमेडी सिनेमात झळकणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतीक्षेत असलेल्या ‘पुष्पा ३’मध्ये ती पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.