
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. महापालिकेवरील सत्ता राखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप आणि शिंदे गट यांच्यात रणनीतीचे मोठे फेरबदल सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — तब्बल १८ वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र आले. या संभाव्य युतीला शह देण्यासाठी भाजपने आता भाषिक राजकारणाच्या अंगाने ‘गुजराती कार्ड’ खेळले आहे.
१८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र
५ जुलै रोजी वरळी डोम येथे मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी आयोजित विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मोठा राजकीय संकेत दिला. “मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत,” असं विधान करत त्यांनी एका नव्या युतीच्या शक्यतेकडे इशारा केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जाऊन भेट दिली.
यामुळे शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे यांची युती होण्याच्या चर्चांना जोर आला असून, भाजप आणि शिंदे गट यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
भाजपची नविन रणनीती – ‘गुजराती तडका’
मुंबई महानगरपालिकेतील सत्तेसाठी निर्णायक ठरणारी गुजराती आणि उत्तर भारतीय मतं आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने थेट सांस्कृतिक भाषिक कार्ड वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या माध्यमातून भाजपकडून सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग यांचे आयोजन करण्यात येत आहे. कांदिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला संवेदना या गुजराती नाटकाच्या प्रयोगामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाषिक मतदारांवर लक्ष
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मराठी, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मराठी मते ठाकरेंच्या एकत्र येण्याने संघटित होण्याची शक्यता लक्षात घेता, भाजप गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाकडे अधिक झुकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘गुजराती अस्मिता’ला साद घालण्याचा प्रयत्न आता राजकीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
आगामी निवडणूक चुरशीची
उद्धव आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे भाजपचा सगळा भर आघाडी मोडून काढण्यासाठी विशेषत: गैर-मराठी मतांवर आहे. मराठी अस्मिता व विरुद्ध भाषिक एकजूट या दोन टोकांवर लढली जाणारी ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्यांवर मर्यादित न राहता, स्पष्टपणे भाषिक आणि अस्मितेच्या मुद्द्यावर पोहोचली आहे.