
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मुंबईत आज मनसे, महाविकास आघाडी आणि डावे पक्ष यांच्या नेतृत्वाखाली ‘सत्याचा मोर्चा’ काढला जात आहे. बोगस मतदार यादी, मतदार यादीतून नावे गायब होणे, निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता अशा गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघत आहे. मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दादरहून लोकलने चर्चगेटकडे रवाना झाले आहेत, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेही मैदानात उतरले आहेत. राज्यभरात या मोर्चाची चर्चा सुरू असताना, भाजपसाठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक ठरलेली बाब म्हणजे भाजपच्या मित्रपक्षातील दोन नेत्यांनी विरोधकांच्या मुद्द्याला समर्थन देणे.
राज्यातील मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी बोगस मतदार यादीच्या मुद्द्यावर विरोधकांच्या आंदोलनाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले.
“निवडणुकीच्या काळात अनेक मुद्दे समोर येतात. बोगस मतदार यादी हा गंभीर प्रश्न आहे. एका यादीमध्ये जास्त नावे, मृत व्यक्तींची नावे दिसत आहेत. लोकांना मतदानाला गेल्यावर आपले नाव वापरून मतदान झालेले आढळते, ही घाण थांबलीच पाहिजे. या मोर्चाला आमचा विरोध नाही,” असे ते म्हणाले.
तथापि, त्यांनी विरोधकांवर टीकाही केली—
“ही स्टंटबाजी आहे. निवडणूक आयोगाला आधीच भेट घेतली आहे, मग रस्त्यावर लोकांना का आणताय? हा फक्त शक्तीप्रदर्शनाचा खेळ आहे. सवाल बैठकीत सुटू शकत होता, मुंबईकरांना वेठीस का धरता?”
शिरसाट यांच्या या वक्तव्याने स्पष्ट झाले की मतदार याद्यांवरील संशय हे केवळ विरोधकांचेच नाही, तर सत्तेत असलेल्या मित्रपक्षांच्याही मनात शंका निर्माण करणारे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मतदार याद्यांवरील अनियमितता मान्य केली आणि विरोधकांच्या मुद्द्याला साथ दिली.
“देशाची लोकसंख्या मोठी आहे, त्यामुळे चुका होऊ शकतात. पण विरोधकांनी यावेळी लवकर निदर्शनास आणले नाही. तरीही जर बोगस मतदार याद्या हा मुद्दा असेल तर आम्हालाही ते मान्य आहे. सदोष यादीवर निवडणुका होऊ नयेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुश्रीफ यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की, भाजपसोबत असलेले सहकारी नेतेही आता मतदार याद्यांवर शंका घेऊ लागले आहेत का?
केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना, मतदार यादीतील विसंगतींच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोर्चा काढला आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांचा सूर आता मित्रपक्षांच्या विधानातही दिसत असल्याने भाजपसमोर नैतिक तसेच राजकीय अडचण निर्माण झाली आहे.
राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे, डावे पक्ष आणि अन्य संघटना एकत्र येऊन मोर्चा काढत आहेत. याला विरोध नाही असे सांगूनही मित्रपक्षांची टीका आणि समर्थनाची मिश्र प्रतिक्रिया ही BJP साठी धक्कादायकच ठरत आहे.
या घडामोडीमुळे महाराष्ट्रात राजकीय रसायनशास्त्र बदलत असल्याचा इशारा राजकीय पंडित देत आहेत. मतदार याद्या, निवडणूक आयोग आणि लोकशाहीची पारदर्शकता हा मुद्दा फक्त विरोधकांचा नाही, तर आता सत्ताधारी युतीतील काही नेत्यांचाच झाला आहे.
मोर्चानंतर राज्याच्या राजकारणाचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.


