
माणदेश एक्सप्रेस न्युज
इस्लामपूर : पोलीसांच्या आशीर्वादाने इस्लामपूर अवैध व्यवसाय सुरू असल्याने पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी अशा मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी इस्लामपूर तहसिल कार्यालयाच्या प्रवेशदारावर आंदोलन केले. यावेळी आत्मदहनापासून आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीसांनी बळाचा वापर करताच झटापटही झाली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी केले.
इस्लामपूर शहरात अवैध व्यवसाय, चोरटी मद्य विक्री, जुगार सुरू असून या अवैध व्यवसायाला पोलीसांचा छुपा पाठिंबा असल्याची तक्रार श्री. पाटील यांनी काही दिवसापुर्वी पोलीस अधिक्षकांकडे केली होती. तक्रारीच्या पुष्ठत्यार्थ त्यांनी मटका चिठ्ठ्याही सोबत जोडल्या होत्या. दि.. भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा आशा पवार यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता.
या इशाऱ्यानुसार भाजप कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन केले यावेळी त्यांनी सोबत आणलेले डिझेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी आंदोलकांच्या हातातून कॅन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. आंदोलकांनी वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी उपस्थित राहून शब्द द्यावा असा आग्रह धरला होता. पोलीस आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, तर महिला आंदोलक अंगाला हात लावायचा नाही असे बजावत होत्या. हा गोंधळ सुमारे दीड तास सुरू होता. अखेर पोलीसांनी आंदोलकांना बळाचा वापर करत ताब्यात घेतले. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेउन सोडून देण्यात आले.