
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई
राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद चांगलाच गाजत असताना, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहाल शब्दांत टीका केली आहे. “आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, ते तुम्हीच ठरवा,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावत दोन्ही नेत्यांना थेट आव्हान दिलं आहे. दुबे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मराठी विरुद्ध हिंदी वादात तापलेलं राजकारण
महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर होणाऱ्या कथित हल्ल्यांमुळे वातावरण तापलेलं आहे. विशेषतः मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंबईत काही हिंदी भाषिकांवर झालेल्या मारहाणीच्या घटना गाजत असतानाच, निशिकांत दुबे यांनी या मुद्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं.
त्यांनी मराठीतून पोस्ट करत लिहिलं की,
“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना महाराष्ट्रात मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा.“
दाऊदशी तुलना करत प्रश्न
दुबे यांनी आपल्या टीकेला अधिक धार देताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची थेट दहशतवादी दाऊद इब्राहिम, मसूद अझहर आणि सलाउद्दीन यांच्यासोबत तुलना केली.
“काश्मीरमध्ये सलाउद्दीन, मसूद अझहर यांनी हिंदूंना हाकललं आणि मुंबईत हिंदी भाषिकांवर हल्ले सुरू आहेत. एकाने धर्माच्या नावाखाली अत्याचार केले, दुसरा भाषेच्या नावाखाली करत आहे. मग यात फरक काय?” असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकीय प्रतिक्रिया अपेक्षित
दुबे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे आणि ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, केंद्रातील सत्ताधारी भाजपचा खासदार अशा प्रकारे भाषेच्या मुद्द्यावरून थेट राज्यातील प्रमुख नेत्यांवर टीका करत असल्यामुळे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषिक मतदारांना हातात घेण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो.