वाढदिवस साजरा करताना मित्रांना पार्टी देण्यासाठी तलावावर गेलेल्या तरुणाचा पब्जी गेम खेळताना मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना नागपूर येथील अंबाझरी तलाव परिसरात घडली. पुलकित राज शहदादपुरी (वय.16) असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत वाढदिवसाचा आनंद साजरा करताना तो पब्जी गेम (PUBG Game) खेळताना 15 फूट खोल खड्ड्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यंदाचा वाढदिवस हा त्याच्या शेवटचा वाढदिवस ठरला. तरुणाच्या अपघाती मृत्युमुळे आणि एकूणच प्रकाराबद्दल परिसरात खळबळ उडाली आहे.
घरच्यांची नजर चुकवून मित्रांसोबतची पार्टी ठरली जीवघेणी
पुलकित राज शहदादपुरी या तरुणाने आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला. मात्र, रात्रीच्या वेळी तो घरच्यांची नजर चुकवून घराबाहेर पडला आणि मित्रांसोबत अंबाझरी तलाव परिसरात आला. त्याला मित्रांसोबत वाढदिवस साजरा करुन पार्टी द्यायची होती. तो आणि त्याचे मित्र बराच काळ अंबाझरी तलावावर बसले होते. तो आणि त्याचे मित्र या ठिकाणी पबजी गेम खेळू लागले. दरम्यान, खेळता खेळता तो इतका मग्न झाला की, चालताना त्याला जमीनीत असलेला खड्डाही दिसला नाही. परिणामी खेळतानाच तो 15 फूट खोल खड्ड्यात पडला. आजुबाजूला अंधार असल्याने त्याला मदत करणे त्याच्या मित्रांनाही शक्य झाले नाही. त्यामुळे पुढच्या काहीच वेळात त्याचा मृत्यू झाला.
15 फूट खोल खड्ड्यात कोसळून मृत्यू
अधिक माहिती अशी की, पबजी खेळताना त्याचा मित्र ऋषिकेश त्याच्या सोबतच होता. मात्र, ऋषिकेश याने एका बाजूने जात खड्डा बरोबर ओलांडला. पण, त्याच्याच पाठिमागे असलेला पुलकीत मात्र पब्जी खेळताना मग्न असल्याने त्याचे लक्ष चालण्याकडे कमी आणि खेळण्याकडे अधिक होते. परिणामी तो खड्ड्यात पडला. खाली पडलेल्या पुलकीत याने वेदनेने आरडाओरडा केला. या वेळी पुढे असलेल्या ऋषिकेशने मागे वळू पाहिले असता पुलकीत मदतीसाठी याचना करत होता. आवाज येत होता मात्र पुलकीत दिसत नव्हता. त्यामुळे घाबरुन गेलेल्या ऋषिकेश आणि त्याच्या इतर मित्रांनी पुलकीत याच्या कुटुंंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनीही शोधाशोध केली मात्र त्याचा ठावठिकाणी न मिळाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला.
दरम्यान, नागपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी उपस्थित दर्शवली. त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने पुलकीत याचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल येताच पुलकीतचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. दरम्यान, पबजी गेम खेळताना मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे पबजी खेळणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला नेहमीच दिला जातो.