
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | मुंबई
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा जगासमोर उघड केलेला खरा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातील विजयापेक्षा मोठा आहे, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष कौतुक करत त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांची स्तुती केली.
केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत, पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी आणि भारताची झिरो टॉलरन्स धोरण अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करत शिंदे म्हणाले, “ही परराष्ट्र धोरणातील ऐतिहासिक पायरी असून भारताची प्रतिमा एक जबाबदार, शांतताप्रिय आणि दहशतवादविरोधी राष्ट्र म्हणून उजळवेल.”
या शिष्टमंडळात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असून, शशी थरूर, रविशंकर प्रसाद, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते अमेरिका, ब्रिटन, यूएई, कतार यांसारख्या देशांचा दौरा करणार आहेत. हा दौरा २२ मेपासून सुरू होणार आहे.
शिंदे म्हणाले की, “दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी मोठा धोका आहे. त्याविरोधात एकवटून उभं राहणं ही काळाची गरज आहे. भारताने हा पुढाकार घेतला हे देशासाठी अभिमानास्पद आहे.”