
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
मराठी मनोरंजन विश्वात प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या रिअॅलिटी शो पैकी ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या सीजनने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून, या वर्षीच्या सहाव्या पर्वाबाबतही चाहत्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. मात्र, हिंदी बिग बॉसच्या वाढवलेल्या कालावधीमुळे मराठी बिग बॉस सीजन 6 वर ग्रहण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या सुरू झालेल्या बिग बॉस हिंदी सीजन 19 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. काही नवीन चेहरे घरात दाखल झाले असून, सुरुवातीलाच वाद, नाट्य आणि मनोरंजनाचा तडका प्रेक्षकांना दिसू लागला आहे. मागील दोन सीजनला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने निर्मात्यांनी यंदा विशेष प्रयत्न केले आहेत. यासाठी मोठे बदल करण्यात आले आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काही रिपोर्ट्सनुसार बिग बॉस 19 हे नेहमीप्रमाणे तीन महिन्यांऐवजी तब्बल पाच महिने चालणार आहे. सलमान खान या शोचे होस्ट असून, त्यांच्या विकेंडच्या वारमधील दमदार स्टाइलमुळे शोला रंगत आल्याचे प्रेक्षक म्हणत आहेत.
बिग बॉस हिंदीचा कालावधी वाढल्यामुळे मराठी बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आतापर्यंतची पद्धत अशी होती की, हिंदी बिग बॉस संपताच किंवा त्याच्या अगोदर मराठी बिग बॉसची सुरुवात होत असे. मात्र, हिंदी शो जर पाच महिने चालणार असेल, तर मराठी बिग बॉस सीजन 6 नेमका कधी सुरू होणार, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
बिग बॉस मराठी सीजन 5 ने विक्रमी यश मिळवले होते. पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांनी मराठी बिग बॉस होस्ट केला होता. त्यांनी घरातील स्पर्धकांशी केलेला संवाद आणि विकेंडच्या वारमधील त्यांची खास शैली प्रेक्षकांना चांगली भावली होती. या सीजनने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले होते.
सध्या प्रेक्षकांमध्ये यंदा शोचे सूत्रसंचालन कोण करणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. महेश मांजरेकर पुन्हा सूत्रसंचालन करणार की रितेश देशमुख यंदाही होस्ट करणार, याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी, धनंजय पवार, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण यांसारख्या कलाकारांनी मागील सीजनमध्ये बिग बॉस मराठीच्या घराला रंगत आणली होती. यंदा घरात कोणते स्पर्धक दाखल होणार, याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत.
सध्या हिंदी बिग बॉस 19 पाच महिने चालणार असल्याने मराठी बिग बॉस सीजन 6 चे प्रसारण काही महिन्यांनी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून निर्मात्यांकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.