
सेन्सेक्स 826 अंकांनी, निफ्टी 239 अंकांनी घसरला
माणदेश एक्सप्रेस न्युज/मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांना अवघ्या 15 मिनिटांत 2.52 लाख कोटी रुपयांचा मोठा फटका बसला. सेन्सेक्स 826.07 अंकांनी घसरून 80,769.59 अंकांवर तर निफ्टी 239.80 अंकांनी घसरून 24,574.05 अंकांवर व्यापार करत आहे.
सकाळच्या सत्रातच बाजाराने घसरायला सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्सने 800 अंकांहून अधिक घसरण नोंदवली. निफ्टीने 24,600 चा टप्पा ओलांडून खाली घसरण केली. सेन्सेक्समधील पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, टीसीएस आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स सर्वाधिक पडले. केवळ अदानी पोर्ट्स आणि इंडसइंड बँकच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात तेजी दिसून आली.
बाजारातील या घसरणीमागे जागतिक आर्थिक अस्थिरता कारणीभूत ठरली आहे. अमेरिकेत US बाँड यील्डमध्ये मोठी वाढ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर कपातीच्या प्रस्तावामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग घसरवल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. विशेषतः बँकिंग आणि आयटी शेअर्सवर याचा मोठा परिणाम झाला.
दरम्यान, ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टेनलीने या घसरणीकडे गुंतवणुकीची संधी म्हणून पाहिले आहे. त्यांच्या अंदाजानुसार, जून 2026 पर्यंत सेन्सेक्स 89,000 अंकांपर्यंत जाऊ शकतो, तर दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणाऱ्यांसाठी 1 लाखाचा टप्पाही गाठला जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.