महाराष्ट्रात काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावे, यासाठी काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 6 नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झालेला असेल आणि तिने महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अनेक नवीन नियम लागू केले जाणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नवीन नियम
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे.
एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे.
केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.
3000 रुपये रक्कम बँकेत जमा होणार
दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेच. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. ही यादी जाहीर होताच त्या यादीत असणाऱ्या महिलांना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान थेट लाभ मिळणार आहे. यानुसार महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांची 3000 रुपये रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.