
माणदेश एक्स्प्रेस न्यूज, मुंबई
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडोनेशियातून परतणाऱ्या दोन आयसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इमिग्रेशन ब्युरोने संयुक्तपणे ही कारवाई केली. हे दोघे मागील दोन वर्षांपासून फरार होते आणि पुण्यात IED म्हणजेच बॉम्ब तयार करण्याच्या कटात सामील होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे:
“अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला,तल्हा खान” हे दोघे जकार्ता, इंडोनेशिया येथून भारतात येत असताना मुंबई विमानतळाच्या टी-2 टर्मिनलवर पकडले गेले. त्यांच्यावर प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. NIA च्या तपासात उघड झाले आहे की, कोंढवा, पुणे येथे अब्दुल्ला फैयाज शेखने भाड्याने घेतलेल्या घरात IED तयार करण्यात आली. 2022 ते 2023 दरम्यान बॉम्ब बनवणे, प्रशिक्षण देणे आणि त्याची चाचणी घेणे यासाठी हे ठिकाण वापरण्यात आले होते.
NIA ने याआधी या प्रकरणात 8 जणांना अटक केली होती. आता अटक झालेल्या या दोघांसह एकूण 10 आरोपींवर यूएपीए, स्फोटक पदार्थ कायदा, आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमब काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकिफ नाचन आणि शहनवाज आलम. या आरोपींनी आयसिसचा अजेंडा पुढे नेत भारत सरकारविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचला होता. देशातील सांप्रदायिक सौहार्द बिघडवणे आणि दहशत पसरवणे हाच यामागचा हेतू असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.


