शेअर बाजारात मोठी घसरण: विमान अपघात आणि इराण-इस्त्रायल संघर्षाचा दणका; गुंतवणूकदार चिंतेत

0
78

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई – अहमदाबादमध्ये एअर इंडिया फ्लाइट AI 171 चा अपघात आणि त्यात 242 प्रवाशांचा बळी गेल्याच्या भीषण घटनेनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. याशिवाय इराण आणि इस्त्रायल यांच्यात उडालेल्या नव्या संघर्षामुळे जागतिक बाजारातही अस्थिरतेचे वातावरण आहे. या दोन्ही घटकांचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे.

 

आज सेन्सेक्समध्ये 1,264 अंकांची घसरण झाली. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 80,427 अंकांवर सुरु झाला, पण काही क्षणांतच तो 1.55 टक्क्यांनी घसरून 80,555.09 अंकांवर आला. निफ्टीतही 415 अंकांची घसरण झाली असून तो 24,473 या स्तरावर पोहोचला.

 

गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान दुर्घटनात 242 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. हा अपघात गेल्या दशकातील सर्वात भीषण मानला जात आहे. याचा तात्काळ परिणाम विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. इंडिगोच्या शेअरमध्ये 3.31% घसरण होऊन तो 5446.35 रुपयांवर बंद झाला, तर स्पाईसजेटचा शेअर 2.40% घसरून 44.40 रुपयांवर बंद झाला. ट्रेडिंगच्या दरम्यान हे शेअर्स आणखी खाली घसरले.

 

 

मध्यपूर्वेत इराण आणि इस्त्रायलमधील नव्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता वाढली आहे. तेलाच्या किंमतीत तेजी दिसून आली असून गुंतवणूकदारांनी धोका टाळण्यासाठी शेअर्स विकायला सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे भूराजकीय तणाव शिगेला पोहचला असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 

आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समधील सर्व 30 कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हात दिसले. निफ्टी 50 मधील केवळ एका कंपनीचा शेअर वधारला, तर उर्वरित 49 कंपन्यांचे शेअर्स घसरले. लार्सन अँड टुब्रोचा शेअर सर्वाधिक 2.77 टक्क्यांनी खाली आला. विश्लेषकांनी अल्पकालीन गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घबराटीच्या वातावरणात निर्णय घेण्याऐवजी स्थिर धोरण ठेवावं, असा सल्ला दिला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here