
माणदेश एक्सप्रेस न्यूज | 26 जुलै 2025
राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. पुढील 24 तास अतिशय गंभीर मानले जात असून, पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात धोक्याची घंटा – समुद्रात जाण्यावर बंदी
कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई आणि ठाणे या महानगरांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही तासांपासून कोकणात ढगाळ वातावरण असून, अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर
पुणे आणि सातारा जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला असून, कोल्हापूर आणि सांगलीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी पुराची भीती असते, त्यामुळे प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा – चंद्रपूर, गोंदिया रेड अलर्टवर
चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट दिला गेला आहे. गोंदियात रात्रीपासूनच पावसाचा जोर सुरू आहे. बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे, आणि धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. चंद्रपूरमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात पाऊस नसला, तरी वातावरण बदललेले असून हवामान विभागाने दोन दिवसांसाठी इशारा कायम ठेवला आहे.
उल्हास नदीचा पाणीप्रवाह वाढला, नागरिकांना इशारा
कर्जत परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. बदलापूर शहरातून ही नदी वाहत असून, सध्या कोणतीही पूरस्थिती नसली तरी प्रशासन अलर्टवर आहे. पालिका प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये संततधार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच वाऱ्यासह संततधार सुरू आहे. कणकवली, कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला असून, आज पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यातही संततधार सुरू असून, सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाबळेश्वरमध्ये काल रात्री अतिवृष्टी झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना इशारा पातळी लक्षात घेऊन सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रही अलर्टवर
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, शेतीच्या दृष्टीने ही स्थिती फायदेशीर आहे, मात्र अतिवृष्टी झाली, तर नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांसाठी हवामान विभागाची सूचना:
नदीकाठच्या वस्तीतील नागरिकांनी सजग राहावे.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
अनावश्यक प्रवास टाळावा.
मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे.
शेतकऱ्यांनी शेतीसंबंधित निर्णय हवामान पाहून घ्यावेत.