
माणदेश एक्सप्रेस न्युज| मुंबई– बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मिळालेल्या जीवघेण्या धमक्यांनंतर त्याच्या सुरक्षेबाबत मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सलमानच्या घराबाहेर घडलेल्या संशयास्पद हालचालींमुळे आणि १९ मे रोजी एका महिलेने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी आता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेशासाठी ‘ओळख पडताळणी’ प्रणाली अनिवार्य केली आहे. इमारतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक नव्या व्यक्तीची ओळख आता इमारतीतील रहिवाशांकडून तपासली जाणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, केवळ विश्वासार्ह ओळख पटल्यासच प्रवेश दिला जाणार आहे.
गेल्या दोन दिवसांत एक महिला आणि एक पुरुष गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले होते. या घटनांमुळे सलमानच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून नव्या सुरक्षाव्यवस्थेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
नवीन सुरक्षाव्यवस्था अन्य मोठ्या सोसायट्यांप्रमाणेच इंटरकॉम आणि रहिवाशांची परवानगी यांवर आधारित असणार आहे. यामुळे कोणतीही अनधिकृत व्यक्ती इमारतीत प्रवेश करू शकणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या सुरक्षाव्यवस्थेचे पालन इमारतीतील प्रत्येक रहिवाशासाठी बंधनकारक असणार असून, सलमान खानच्या सुरक्षेसाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता, असे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.