शरद पवार गटाला मोठा धक्का;पुण्यात अजित पवार गटाची महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

0
58

माणदेश एक्स्प्रेस न्यूज| पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या गड मानल्या जाणाऱ्या हडपसर मतदारसंघात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

 

शरद पवार गटाला मोठा धक्का देत हडपसरमधील दोन माजी उपमहापौर आणि एका माजी नगरसेवकाने अजित पवार गटात प्रवेश केला आहे. माजी उपमहापौर निलेश मगर, बंडू तात्या गायकवाड आणि माजी नगरसेवक योगेश ससाने यांनी आज अधिकृतरित्या अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

हडपसर हा मतदारसंघ महापालिकेत राष्ट्रवादीसाठी बालेकिल्ला मानला जातो. 2017 च्या निवडणुकीत येथे 17 ते 18 नगरसेवक निवडून आले होते. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चेतन तुपे यांची आमदारपदी निवड झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतरही अजित पवार गटाने येथे आपले वर्चस्व टिकवले आहे आणि आता ते अधिक बळकट करण्यासाठी ही डावपेच रचले जात आहेत.

 

विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांच्या गडातूनच असे महत्वाचे नेते अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटासाठी ही मोठी धक्कादायक घटना मानली जात आहे. अजित पवार गटाच्या या हालचालीमुळे हडपसरसह पुण्यातील महापालिका निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. राजकीय पटलावर या प्रवेशामुळे उत्सुकता वाढली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here