
माणदेश एक्स्प्रेस न्यूज | बीड
दिवाळीच्या सणात जसा फटाक्यांचा आवाज आकाश दणाणवून सोडतो, तसाच स्फोटक राजकीय फटका मारत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ, ओबीसी नेते आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच जरांगेंनी “ठुसका फटाका” या शब्दांनी भुजबळांना फोडलेला राजकीय बॉम्ब सध्या चर्चेत आहे.
जरांगे पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर लगेच सरकारवर तुफान तोफ डागली.
ते म्हणाले, “सरकारचं धोरणच असं आहे — तात्पुरता आनंद द्यायचा. शेतकऱ्यांना फसवणूक करून त्यांचा मूळ प्रश्न टाळायचा. पॅकेज जाहीर करून सरकार स्वतःच आनंदी होतं, पण शेतकऱ्यांच्या खिशात काहीच पडत नाही.”
त्यांनी पुढे म्हटलं, “फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांचं पोट भरत नाही. आता शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. दिवाळीनंतर आम्ही शेतकरी तज्ञ, अभ्यासक, आणि सर्व पक्षातील प्रतिनिधींना बोलवून पुढील मार्ग ठरवणार आहोत.”
जरांगेंनी शेतकऱ्यांच्या वेदना शब्दात मांडल्या.
ते म्हणाले, “सोयाबीन-कापूस विकून लेकरांना दोन घास गोड देऊ असं वाटलं होतं, पण यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी दुःखद ठरली. सरकारने याची दखल घेतली नाही, म्हणून आता या नेत्यांची फरफट आपण करणारच. त्यांचे कपडे काढावे लागतील तेव्हाच त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या समजतील.”
ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनाही जरांगेंनी चिमटा काढला. ते म्हणाले,
“मी आतापर्यंत बबनराव तायवाडेंवर बोललो नव्हतो, पण आता त्यांच्याबद्दल कीव वाटते. त्यांना घाण बोलणाऱ्यांना लाथा मारून हाकललं पाहिजे. तुम्ही इतके घाण शब्द ऐकूनही गप्प बसता, हे दुर्दैवी आहे.”
मराठा-कुणबी जीआरच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं — “तो जीआर रद्द करायची कोणाची टप्पर नाही. सरकारने ओबीसींना खुश करण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यांना गोंधळात टाकता येणार नाही.”
जरांगे म्हणाले, “बीडमध्ये जिथे आमची घोंगडी बैठक झाली, त्याच ठिकाणी बीडच्या सभेला बावनकुळे आले आणि भाषण दिलं. त्यात त्यांनी जे बोलले, त्यात चूक नाही. कारण मराठ्यांचं आणि फडणवीसांचं जुळलंय. सरकारमध्ये राहून काहीजण फडणवीसांना डॅमेज करण्याचं काम करत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “ओबीसीला धक्का बसणार नाही. कारण आधी आम्हीच ओबीसी आहोत. आम्ही दीडशे-दोनशे वर्षांपासून आहोत; आमच्या अधिकारावर कुणी डल्ला मारू शकत नाही.”
छगन भुजबळ यांच्यावर जरांगेंनी टीकेचा वर्षाव केला.
ते म्हणाले, “भुजबळांना कोणत्याही फटाक्याची उपास नाही. ते स्वतःच ठुसका फटाका आहेत. भुजबळ फक्त भेदभाव पसरवत आहेत. मराठवाड्यातील मराठी माणूस आरक्षणात जाणारच. बीडमधील आमची बैठक झाली ते ठिकाण भुजबळांना महाएल्गार वाटला. त्यांची सभा इतकुशी आणि आमची घोंगडी बैठक गजबजलेली. यातच फरक आहे.”
त्यांनी ठामपणे सांगितले, “मराठी माणूस तात्पुरत्या आनंदात जगणारा नाही. आम्ही हक्कासाठी झगडतो आणि झगडत राहणार.”
जरांगेंच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ओबीसी नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली असून, भुजबळांच्या समर्थकांकडूनही उत्तरं येऊ लागली आहेत.
दिवाळीच्या फटाक्यांपेक्षा जरांगेंच्या शब्दांच्या ठिणग्यांनी राजकीय वातावरण अधिक पेटवलं आहे.