आरक्षणाच्या गोंधळात भुजबळांचं नवं समीकरण; मराठ्यांना निर्णय घ्या असं आवाहन

0
222

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
ओबीसी नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मोठा डाव टाकला आहे. “EWS की ओबीसी, कोणत्या आरक्षणाचा खरा फायदा, आणि नुकसान तरी कुणाचं?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी मराठा समाजातील संभ्रमाला हात घातला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण, कुणबी ओळख व EWS चा लाभ या संदर्भात सुरू असलेल्या वादाला भुजबळांनी नवी कलाटणी दिली आहे. त्यांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा अप्रत्यक्ष टोला लगावत “नेत्यांपेक्षा समाजाने स्वतः ठरवायला हवं की कुठे फायदा आहे” असा सूर आळवला.


भुजबळ यांनी थेट मराठा समाजाला उद्देशून विचारलं –
“तुम्हाला 10 टक्के EWS आरक्षण हवंय की ओबीसीमध्ये यायचं आहे ते आधी ठरवा. मेडिकल व शिक्षण क्षेत्रात ओबीसींचा कटऑफ जास्त आहे, तर EWS चा कटऑफ खाली आहे. मग हा फायदा आहे की नुकसान, हे समाजाने ठरवायला हवं.”

त्यांनी सांगितले की, “राजकारणात मराठा समाजाचं आरक्षण आधीच आहे. सरपंच, आमदार, खासदार, मंत्री बहुसंख्य ठिकाणी मराठेच आहेत. मग नेमकं आरक्षण शिक्षण-नोकरीत हवंय की राजकारणात, हे स्पष्ट करावं.”


आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख न करता भुजबळ म्हणाले –
“काही नेत्यांनी या मुद्यावर स्पष्ट बोललं तर बरं होईल. नाहीतर एकतर्फी मते समाजासमोर जात आहेत. काही लोकांनी तर EWS प्रमाणपत्र घेतलंय, मराठा आरक्षणासाठी अर्ज केलाय आणि कुणबी ओळखही पुढे केली आहे. अशा गोंधळात इतर समाज जायचं कुठे?”


मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास आपण विरोध करत नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. “नियमाप्रमाणे जर आंदोलकांना सवलत दिली जात असेल तर माझा विरोध नाही. पण शेतकरी, कष्टकरी, अन्यायाविरोधात रस्ता रोको करणाऱ्यांनाही तोच नियम लागू व्हायला हवा,” अशी मागणी त्यांनी केली.


एसईबीसी आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट करताना भुजबळ म्हणाले –
“व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग स्थापन केला, तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढत आहोत. आमची केस नऊ जजांच्या बेंचपुढे गेली आणि तिथूनही आम्ही लढलो. आरक्षणाच्या लढाया कोर्टातूनच लढाव्या लागतात. त्या लढाया सुरूच राहणार.”


भुजबळ यांची ही ताजी भूमिका लक्षवेधी मानली जाते. आतापर्यंत ते आंदोलनकर्त्यांना थेट लक्ष्य करत होते; मात्र आता त्यांनी मराठा समाजालाच थेट गणित मांडून निर्णय घ्यायला लावण्याची रणनीती स्वीकारली आहे. मराठा-कुणबी भेद अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरेल का, हे येणारा काळ ठरवेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here