
भिगवणमध्ये गाजलेल्या कथित अपहरण प्रकरणाला अखेर नवे वळण मिळाले आहे. मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मसाला (चटणी) टाकून मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर या घटनेला धार्मिक रंग मिळाला होता. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. भिगवणमध्ये बंद पाळण्यात आला असून हिंदू आक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. हा मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला होता.
दरम्यान, संबंधित मुलीने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत आपले अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. आपण स्वखुशीने मुलासोबत गेलो असून मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, मुलीवर दबाव टाकून हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचा आरोप आमदार पडळकर आणि मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.
या सर्व घडामोडींनंतर मुलगी अखेर पोलिस ठाण्यात हजर झाली असून तिने अधिकृत जबाब नोंदवला आहे. बारामती पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तिचे अपहरण झाले नसून ती स्वतःच्या इच्छेने प्रियकरासोबत गेली होती. या काळात दोघांनी श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करत महाबळेश्वर येथे आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
‘चटणी टाकल्याचा’ बनाव फोल
मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार देताना जहीर हरून शेख आणि आयान हरून शेख यांनी आपल्या डोळ्यात चटणी टाकून बहिणीचे अपहरण केल्याचा आरोप केला होता. मात्र, मेडिकल रिपोर्टमध्ये भावाच्या डोळ्यात कोणतीही चटणी टाकण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. उलट, मुलीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला बोलावून घेत स्वतः त्याच्यासोबत निघून गेल्याची बाब पुढे आली आहे.
दरम्यान, मुलगी पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना संपर्क साधून पोलिस ठाण्यात येण्याचे आवाहन केले. मात्र, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव, राजकीय प्रतिक्रिया आणि तपासातील निष्कर्ष यामुळे भिगवण परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे.


